सौंदर्याची संकल्पना काय…? वेळ काढून नक्की वाचा …मराठमोळ्या सिध्दार्थ जाधव चा लेख !

प्रेरणादायी मनोरंजन मराठी कलाकार

सुंदर असण्याची व्याख्या ज्या ज्या वेळी केली जाते, त्यावेळी अजूनही आपण किती कर्मठ आहोत असंच मला वाटतं. कारण आपल्या शारीरिक सौंदर्याच्या तर अगदी ठरवलेल्या चौकटिबध्द संकल्पनांमध्ये आजही आपण अडकून आहोत.
-सिद्धर्थ जाधव

सौंदर्याची संकल्पना काय…? असा प्रश्न जर मला विचारला तर आजही दोन मिनिटं थांबून मी विचार करतो. कारण ती मला कायम काठावरून पाहण्याजोगी गोष्ट वाटलीय. मला एक गोष्ट कायम वाटते की, सौंदर्य म्हणजे आरशासमोर उभं राहील की जे दिसतं ते नाही… तुमचं मन, बुद्धी, शक्तिस्थानं.. माझ्या दृष्टीने हे सौंदर्य आहे.. अगदी खरं सांगू का..
मागे वळून पाहताना आज मला आठवतो तो म्हणजे जवळ जवळ १३ वर्षांपूर्वीचा सिद्धार्थ जाधव… किरकोळ अंगाचा, झिपरे केस, गाल आत आणि दात बाहेर.. मी असाच एका हिंदी टेलिव्हिजन सिरीयलच्या ऑडिशनला गेलो. त्यांचा लंच ब्रेक झाला होता आणि माझ्या सारखा मुलगा ऑडिशनला आलेला बघून त्यांना तर आयता बकरा मिळाला टाईमपास करायला, म्हणून त्यांनी मला २ लाईन्स बोलायला सांगितल्या आणि मला सिलेक्शनबद्दल नंतर कळवतील असं सांगितलं. मला माहिती होतं कि हे लोक मला सिलेक्ट करणार नाही आहेत. त्याक्षणी खूप जास्त वाईट वाटलं. घरी गेलो तोच रडत रडत, स्वतःच्या नशिबाला आणि आई बाबांनी मला नीट का नाही ठेवलं म्हणून त्यांनापण कोसलं.. तुमचं दिसणं इतकं महत्वाचं असतं??? त्या रात्री मन स्थिर नव्हतं… मनात प्रश्नांचं मोहोळ उठलं होतं. पण तिथपासून आतापर्यंतच्या या प्रवासात ‘तुमचं दिसणं महत्वाचं नसतं, तुमचं असणं खूप महत्वाचं असतं.’ ही गोष्ट मला स्वतःला कळायला खूप वर्ष निघून गेली.

दिसणं, बाह्यरूप हे नेहमीच आपण महत्वाचं मानत आलोय पण याच गोष्टीसाठी आपण आपल्यामधील खऱ्या गुणांना नजरअंदाज करतो आणि जे आपल्याकडे आहे त्यापेक्षा जास्त जे आपल्याकडे नाही त्याचंच आपण जास्त वाईट वाटून घेतो. आपल्या शक्तिस्थानांचा विचार प्रामुख्याने करणं तितकंच गरजेचं असतं. मुळात आपली खरी ओळख म्हणून या गोष्टींचा वापर झाला तर त्या गोष्टी अधिक खुलून येतात, हे सांगायला माझी गरज नाही, पण आपण तर आपल्याकडे नसलेल्या गोष्टींचा जास्त विचार करत असतो.

सिद्धार्थ जाधव हा तेव्हाही दिसायला बरा नव्हता आताही तो इतका हँडसम नाही आहे, ही वस्तुस्थिती मला मान्य आहे. मला माझं काम उत्तमपणे करता येतं… त्या त्या प्रयोगाला माझ्याकडे असलेलं सारं काही पणाला लावून मी स्वतःला आजमावून पाहतो. आज जो काही मी तुमच्यासमोर आहे तो याच माझ्यातील सिद्धार्थपणामुळे…

पण या सगळ्याला न्याय दिला तो माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या माझ्या दिग्दर्शकांनी, निर्मात्यांनी. त्यांनी लूक्सपेक्षा माझ्यातील गुणवत्तेला प्राधान्य दिलं. कारण एकंदरीतच या क्षेत्रात नेमकी उलट परिस्थिती आहे. गुणवत्तेपेक्षा लुक्सला प्राधान्य दिलं जातं. पण मी या मराठी सिनेसृष्टीचा खरंच आभारी आहे की तिने कधीच आमच्या सारख्या कलाकारांना दिसण्यावरून डावललं नाही तर आमच्यातील गुणवत्तेला व्यासपीठ दिलं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून दिल्या…सलाम माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रेक्षकाला.. त्यांच्यामुळे आज मी जो कोण आहे तो होऊ शकलो.. केवळ त्यांच्या पाठिंब्यामुळे… नाहीतर भोईवाड्याच्या झोपड्पट्टीतला हा सिद्धार्थ जाधव प्रेक्षकांच्या मनात घर करू शकला नसता.

चेहऱ्यापेक्षा अभिनय गुणांमुळेच दादा कोंडके, अशोक सराफ, निळू फुले, नसीरुद्दीन शाह ही नावं अजरामर झाली.

मराठी सिनेसृष्टीतील नट हा आपल्यातलाच आणि आपला वाटणारा असतो. जर मी दिसायला गोरा गोमटा आणि गालावर खळी पडणारा चॉकलेट बॉय असतो तर कदाचित मला ‘हुप्प हुय्या’ मधील ‘हणम्या’, ‘दे धक्का’ मधील ‘धनाजी’, ‘लालबाग परळ’ मधला ‘स्पीडब्रेकर’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ मधला ‘उस्मान पारकर’ आणि अशा वेगवेगळ्या भूमिका करायला नसत्या मिळाल्या. मराठी सिनेसृष्टीसोबतच मी मराठी रंगभूमीचा देखील आभारी आहे, कारण रंगभूमीने आमच्या सारख्या चेहरा नसलेल्या कलाकारांना चेहरा ‘मिळवून’ दिला. महेश मांजरेकर सरांसारख्या पारखी जोहरीने माझ्यातील कलाकाराला न्याय दिला. संधी दिली… अन संधीचं सोनं कसं करायचं याचा मार्ग दाखवला. देवेंद्र पेम सर, केदार शिंदे सर यांसारख्या मातब्बर दिग्दर्शकांनी माझ्याकडून प्रचंड मेहनत करून घेतली अन दिशा दिली. भरत जाधव, अंकुश चौधरी, विकास कदम, पंढरीनाथ कांबळी, अमित भंडारी, शैलेश परुळेकर सर यांसारख्या फ्रेंड्स, फिलॉसोफर अँड गाईड्सनी मला जगण्यासाठी बळ दिलं. याचं ऋण कधीच न फेडता येणार.

मी देखील माझ्या दिसण्याचा न्यूनगंड बाळगून होतो, इतकंच काय तर मी माझ्या दाताला तार लावण्याचा तसंच दातांमधील फट मिटवण्याचा प्रयत्न देखील केला पण ते काहीकेल्या नाही झालं. माझा गाईड आणि सपोर्ट सिस्टीम म्हणजे माझा दादा डॉक्टर लवेश जाधव याने मला समजावलं कि तुझी जॉ लाईन वेगळी आहे आणि तेच तुझं वेगळेपण आहे, लोकं तुला तसंच पसंत करतात त्यामुळे तू दाताला तार किंवा फट मिटवायला गेलास तर तुझं वेगळेपणच निघून जाईल.

आज मी इतका मोठा नाही की, कोणाला सल्ला देईन, पण मला जी गोष्ट पटली ती सांगतो… आपल्यातल्या वेगळेपणाला जपा…

मी जेव्हा Acting ला सुरुवात केली तेव्हा intercollegiate competitions, मग एखादं व्यावसायिक नाटक त्यानंतर सिरीयल आणि मग चित्रपट असा प्रवास होता पण आता intercollegiate नंतर लगेच सिरीयल मिळत असल्यामुळे जो मधला स्ट्रगल आहे तो कुठे तरी वगळून गेला आहे, आणि आजच्या वाढत्या competition मध्ये कोणी आपल्यापेक्षा बरा दिसणारा असलं कि आपल्याला दडपण येतं आणि त्यांना लीड रोल मिळाला आणि मला नाही मिळाला या ‘So called Comparison’ मध्ये आपण मागे पडतो. ‘भलेही छोट्यातली छोटी भूमिका का मिळेना पण मी त्या भूमिकेत सर्वस्व ओतून काम करेन.’ ही जिद्द नवोदित कलाकारांनी बाळगायला हवी असं मला वाटतं.

१९९९ पासून मी या क्षेत्रात पाऊल टाकण्यासाठी धडपडत होतो पण आजही नवीन क्षितिजं मला खुणावतात… प्रत्येक भूमिकेत माझ्या जगण्यातला तुकडा मी देत असतो. प्रत्येक व्यक्तिरेखेची ती गरज आहे, असं मला वाटतं. तीच खरी आरोग्य धन संपदा आहे असं मी मानतो. त्यामुळे आपल्या हातात चेहरा नाही, पण आपलं शरीर घडवण्याची क्षमता आपल्याकडे असते. त्यामुळे आपण आपल्याला तसं घडवू शकतो… उत्तम शरीर कमावणं,निरोगी राहणे हे खूप गरजेचं आहे. दोन तीन महिने व्यायामशाळेत जाऊन काही फरक पडत नाही, तो जगण्याचा भाग होणं गरजेचं आहे. आपल्या हाती असलेल्या गोष्टी शंभर टक्के पणाला लावून करायला हव्यात असं मला कायम वाटतं… मग शरीर कमावणं असो वा व्यक्तिरेखा साकारणं…

कॅमेऱ्यासमोर असो वा लाईव्ह परफॉर्मन्स, माझ्या दृष्टीने तुमच्यातील माणूसपणाला खूप महत्व आहे. तुम्ही या गोष्टीकडे कसे पाहता हे खूप महत्त्वाचं आहे.. जगण्यातला अन जगण्याच्या तत्वज्ञानाला खूप महत्व आहे. विचार, तत्त्व अन मूल्य हे तुमच्या सौंदर्याचे अविभाज्य घटक आहेत असं मला वाटतं. माणुसकीतला ओलावा जिवंत राहण्यामधील संवेदनशीलता ही तुमच्यातील कलाकाराला कायम जिवंत ठेवत असते.

मनातल्या न्यूनगंडाची जागा ही तुमच्या शक्तिस्थानांनी घेतली तर त्या सगळ्या गोष्टींमधील गंमत जगण्याला एक वेगळी उभारी देईल. स्टेज असो वा कॅमेरा जगण्याला दिशा देणारे फॅक्टर्स तुमच्या आयुष्यात येतं असतात. संधीचं सोनं करण्यासाठी वाट बघत बसू नका.. संधी निर्माण करणाऱ्यांपर्यंत पोहोचणं कर्तव्य समजा.. तुमची गरज निर्माण होईल, असं स्थान बनवा. आपल्यापेक्षा सुंदर दिसणारे लोक आहेत हा त्यांच्या गुन्हा नाही आहे, त्यांचं अस्तित्व मान्य करा आणि त्यांच्या सोबत सो कॉल्ड कम्पॅरिजन न करता आपल्या कलागुणांनी आपण स्वतः कसे पुढे जाऊ शकतो यासाठी प्रयत्न करा.

आणि महत्वाचं म्हणजे आशा.. Hope हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. आशेचे किरण मनाला उजळवून टाकतील, अशी परिस्थिती दरवेळी निर्माण होईलंच अशी शक्यता नसते. त्यावेळी जिद्दीने काम करत आपल्याला नव्याने आजमावत राहणं गरजेचं आहे, असं मला वाटतं.

खूप आनंदी राहा… सकारात्मक राहा अन तुमच्या शक्तिस्थानांचा गांभीर्याने विचार करा… यश तुमचं आहे.. तुमचाच सिद्धू…

-Written by – सिद्धार्थ जाधव (Actor)

धन्यवाद सिध्हू या सुंदर लेख साठी

1 thought on “सौंदर्याची संकल्पना काय…? वेळ काढून नक्की वाचा …मराठमोळ्या सिध्दार्थ जाधव चा लेख !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *