गडचिरोलीची कारली विमानाने दुबईला; शेतकऱ्याला मिळतोय पैसाच पैसा

Marathi

राज्यातील सर्वात मागास जिल्हा अशी पूर्वंपार चालत आलेली ओळख पूसत गडचिरोली जिल्हा कात टाकत आहे. आधुनिक शेतीचा मार्ग स्विकारत येथील शेतकऱ्यांनी आता नगदी पिके घेण्यास सुरूवात केली असून, गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील शेतकरी नियमीतपणे शेकडो क्विंटल माल विदेशात निर्यात करत आहेत. प्रामुख्याने गडचिरोलीच्या कारल्यांना दुबईमध्ये विशेष मागणी आहे. त्यामुळे येथील शेतकरी आपला शेतमाल नागपूर मार्गे थेट दुबईला रवाणा करत आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज तालुका हा भाजिपाला उत्पादनात अग्रेसर आहे. येथील शेतकरी सर्व प्रकारचा भाजीपाला पिकवतात. अपवाद केवळ कोबी या पिकाचा. कोणत्याही दिवशी येथील भाजीपाला मार्केटमध्ये तुम्ही चक्कर टाकाल तर, ताज्या भाजीपाल्यांनी बाजारपेठ फुलून गेलेली आपल्याला पहायला मिळेल. भाजीपाला ठोक भावाने विकण्यासाठी येथील शेतकरी सकाळीच आपला शेतीमाल मार्केटला घेऊन येतात. सर्व भाजीपाला येथील शेतकरी पिकवत असतील तरी, शेतकऱ्यांचे अधिक लक्ष असते ते, कारले या पिकाकडे. रबी आणि खरीप अशा दोन्ही हंगामात कारल्याचे पीक घेता येते. तसेच, दुबईमधील मार्केटमध्येही येथील कार्ल्याला विशेष मागणी असल्याने हे पीक घेण्याकडे येथील शेतकऱ्याचा विशेष कल दिसतो.

देसाईगंजच्या मार्केटमधून दररोज शेकडो क्विंटल कारले आणि इतर भाजीपाला निर्यात केला जातो. सर्व भाज्यांच्या तुलनेत कारल्याला अधिक भाव मिळत असल्याचे येथील शेतकरी सांगतात. २० किलो ग्रॅमच्या बॅगमध्ये कारल्याचे पॅकींग केले जाते व ते ठोक भावात व्यापाऱ्याला विकले जाते. पॅक केलेला माल ट्रकच्या माध्यमातून नागपूर मार्गे दुबईच्या, शारजा येथे पाठविला जातो. नागपूरच्या लोकल मार्केटमध्येही गडचिरोली (देसाईगंज) कारल्यांना विशेष मागणी असते.

गडचीरोली हा जिल्हा तसा अदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यातच नक्षलवाद आणि शिक्षणाचा अभाव यांमुळे महाराष्ट्र राज्य निर्मितीला साठ वर्षांहूनही अधिक काळ लोटला असला तरी, विकासाची गंगा अद्याप इतवर पोहोचलीच नाही. येथील अनेक पाड्यांवर अद्याप विजेचा प्रकाशच पोहोचला नाही. त्यातच नक्षलवादी कारवांयांनी प्रशासन आणि येथील स्थानीक लोक यांना जेरीस आणलेले आहे. अशा स्थितीत येथील शेतकऱ्यांची ही कामगिरी अत्यंत कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे येथील कारले आणि शेतीमालास व्यापारीही चांगली पसंती देत आहेत. शेतकऱ्यांचे कष्ट आणि व्यापाऱ्यांचे सहकार्य अशी युती झाल्यास येत्या काळात गडचिरोली जिल्हा अल्पावधीतच अन्नधान्याच्या बाबतीत उच्चांग गाठेल, असा विश्वास व्यापारी आणि कृषिविषयाचे अभ्यासक व्यक्त करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *