आर. श्रीलेखा पहिल्या महिला पोलीस महासंचालक महिलांसाठी प्रेरणादायी गोष्ट!

Stay Motivated

त्या १९८७ च्या बॅचच्या केरळ केडरमधल्या पहिल्या महिला पोलिस अधिकारी. त्यानंतर अवघ्या तीन वर्षांत त्या राज्यातील पहिल्या पोलिस अधीक्षकही झाल्या. आता त्यांनी आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.

नुकतीच त्यांना पोलीस महासंचालकाचे पद मिळाले असून, या पदावर काम करणाऱ्या त्या केरळमधील पहिल्या महिला अधिकारी आहेत. त्यांचे नाव आहे आर. श्रीलेखा. महिलांसाठी काही क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणे आजही कसरतीचे काम असताना पोलीस दलात इतक्या मोठ्या पदावर झालेली त्यांची नियुक्ती तमाम महिलावर्गासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

श्रीलेखा आता केरळमधील कारागृहाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. सेवेमध्ये येण्याआधी त्या प्राध्यापक म्हणून तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत होत्या.

१९८६ मध्ये त्या राष्ट्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झाल्या आणि केरळ केडरमधील पोलीस खात्यात दाखल होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. सीबीआयमध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांनी त्रिसूर, आलपुझ्झा आणि पठानमथिट्टा या तीन जिल्ह्यांमध्ये काम केले. दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी पथकात उपद्रवींवर धडक कारवाई करणाऱ्या अशी त्यांची ओळख निर्माण झाली आणि त्यांना रेड श्रीलेखा म्हणून ओळखले जाऊ लागले.

आपले काम अतिशय चोखपणे बजावणाऱ्या श्रीलेखा यांचा २०१३ मध्ये राष्ट्रपतीपदकाने सन्मान कऱण्यात आला.

श्रीलेखा यांनी मल्याळी भाषेत अनेक पुस्तके लिहिली असून, त्यातील तीन पुस्तके गुन्हे अन्वेषणावर आहेत. आपल्या धडाकेबाज कामाने पोलीस दलात स्वतःची वेगळी छाप निर्माण करणाऱ्या श्रीलेखा यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत असताना आता त्यांच्यावर पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

डॉ. सेतूनाथ हे त्यांचे पती असून, त्यांना गोकूळ नावाचा एक मुलगाही आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *